Pune: पुरंदर विमानतळ मंजुरीचे काम पूर्ण; भूसंपादन प्रक्रियेची प्रतीक्षा

पुणे – पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मंजुरीचे काम पूर्ण झाले. मुळ जागेवरच हे विमातनळ उभारण्याच्या प्रस्तावाला नागरी हवाई वाहतूक संचालनालयानेही (डीजीसीए) मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया ही भूसंपदानाची आहे. राज्य सरकारकडून त्याबाबत हालचाली सुरू असून, लवकरच भूसंपादनाला सुरुवात होईल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात मोहोळ बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते. मोहोळ यांनी पुरंदर विमानतळासह पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल आणि धावपट्टीबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने या विमानतळासाठी पुरंदरमधील जागा निश्चित केली होती. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या (एमएडीसी) या प्रस्तावाला केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाने मान्यता दिली. दरम्यान, यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने एमएडीसीमार्फत नव्या जागेवर विमानतळाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आले.
या सरकारने मूळ जागेवरच विमानतळाचा प्रस्ताव नव्याने केंद्राकडे पाठविला. या जागेला संरक्षण मंत्रालयाच्या पाठोपाठ १५ जून रोजी डीजीसीएनेही मान्यता दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासनामार्फत भूसंपादनाची प्रक्रियेला गती दिली जाईल, अशी खात्री असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.
लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार होणे आवश्यक आहे. त्यामुळे अन्य राज्यांसह आंतररराष्ट्रीय विमानसेवा वाढविणे शक्य होणार आहे. धावपट्टी वाढविण्यासाठी ३५ एकर जागेची गरज आहे. या जागेचे संपादन कसे करायचे, भूसंपादनाचा मोबदला कसा द्यायचा याविषयी विचार सुरू आहे. या संदर्भात संबंधित घटकांची एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
लोहगाव विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच सुरू व्हावे, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. या टर्मिनलसाठी आवश्यक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आदेश शहा यांनी दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच नवे टर्मिनल वापरासाठी खुले होईल. तर नवी मुंबई विमानतळ मार्च २०२५ पर्यंत कार्यान्वित होईल, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.




