पुणे: मध्यवर्ती भागासाठी ‘पुण्यदशम्’ ठरली वरदान!

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात व्यापारी पेठा आहेत. तसेच रस्तेही अरूंद आहेत. त्यामुळे या भागात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी तसेच कोंडीमुळे वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली पुण्यदशम् बससेवा महत्वाची ठरली असून तीन वर्षांत एक कोटीहून अधिक नागरिकांनी प्रवास केला आहे. त्यामुळे भविष्यात या सेवेचा विस्तार करणार असल्याची ग्वाही भाजप महायुतीचे कसबा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांनी दिली. रासने यांच्या प्रचारार्थ शनिवार आणि नारायण पेठेत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, राजेश येनपुरे, गायत्री खडके, राजेंद्र काकडे, उदय लेले, सुनील रसाळ, सुनील रासने, महेश सुर्यवंशी उपस्थित होते.
रासने म्हणाले, “मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना पुण्यदशम योजनेसाठी ५० मिडी बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ही योजना पुणेकरांसाठी अल्पावधीतच यशस्वी ठरली. शहरातील अरुंद रस्त्यांवर मध्यम आकाराच्या बसेसने प्रवाशांना सुरक्षित आणि सक्षम पर्याय असल्याने मध्यवर्ती भागात जाण्यासाठी नागरिकांकडून स्वत:च्या गाड्या ऐवजी या बसेसला पसंती देण्यात आली. त्यातच, या योजनेतील बसगाड्या सीएनजीवर चालणाऱ्या असल्याने प्रदूषण कमी झाले तर खासगी वाहनांची संख्या मध्यवर्ती भागात नियंत्रणात आल्याने वाहतूक कोंडीची समस्याही सुटली. तसेच पहिल्या टप्प्यात कसबा मतदारसंघातील सर्व मध्यवर्ती पेठा, स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पूलगेट या वर्तुळाकार मार्गावर प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. पुढील काळात आणखी ३०० मिडी बसेस घेण्याचे नियोजन असल्याचे आश्वासनही रासने यांनी यावेळी दिले.





