Pune : पुण्याचा पुराचा धोका ४० टक्क्यांनी वाढला?

पुणे : गेल्या १४ वर्षांत मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याला अडथळे निर्माण झाल्याने शहराचा पुराचा धोका ४० टक्क्यांनी वाढला असल्याचा दावा पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. पाटबंधारे विभागाने माहिती अधिकारात दिलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच टेरीच्या अभ्यासानुसार पुण्यात पावसाचे प्रमाण ३७ टक्क्यांनी वाढणार असल्याने भविष्यात नदीकाठच्या भागात पूराचा धोका आणखी वाढण्याची भीती असल्याचेही त्यांनी सांगितले केले. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, पुष्कर कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
यादवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटबंधारे विभागाने मुळा-मुठा नदीची पूररेषा १ लाख १८ हजार क्यूसेक निश्चित केली आहे. ही पातळी इशारा पातळी म्हणून ओळखली जाते. मुळा-मुठा नद्यांच्या संगमानंतर बंडगार्डन येथे ही पूरपातळी ५४२.४५ मीटर निश्चित केली आहे. म्हणजेच या दोन्ही नद्यांमधून १ लाख १८ हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आल्यानंतर ही पातळी गाठली जाणे अपेक्षित आहे.
मात्र, २५ जुलै २०२४ च्या पुराच्या वेळी केवळ ६९ हजार १११ क्यूसेक पाण्यानेच ५४२.४५ मीटरची पूरपातळी गाठली होती. तसेच यावर्षी २० ऑगस्ट रोजी सोडलेल्या ७१ हजार ४०८ क्यूसेक पाण्यानेही हीच पूरपातळी गाठली. त्यामुळे ही आकडेवारी पाहता नदीची पूर वहन क्षमता ४० टक्क्यांनी घटल्याचे स्पष्ट होत असल्याचे यादवाडकर यांनी सांगितले.शहरासाठी ही धोक्याची घंटा असून याला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली.
‘माहिती अधिकारात पाटबंधारे विभागाने माहिती अधिकारात दिलेल्या आकडेवारीवरून नदीची वहन क्षमता ४० टक्क्यांनी घटल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे महापालिकेने आणखी वेळ न घालवता नदीपात्र प्रवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने उपाययोजना केली नाही तर भविष्यात शहरातील पुराची तीव्रता आणखी वाढणार आहे.’– विवेक वेलणकर (अध्यक्ष, सजग नागरिक मंच)





