Pune: स्वानंद प्राथमिक विद्यालयात ‘योग दिन’ उत्साहात साजरा
Pune: धायरी परिसरातील स्वानंद प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Pune: धायरी परिसरातील स्वानंद प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण करणे, तसेच त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व आणि योग दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमी समजावून सांगितली, तसेच नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी ‘सहजयोग परिवार’, पुणे या संस्थेतील वैशाली रायकर, साधना काळे, प्रियांका सोनार, नीलम अढुळकर व वरद बावळे इत्यादी सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. श्रुती मनोरे यांच्या हस्ते सर्व उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान साधना काळे यांनी विद्यार्थ्यांना ‘आंतरिक शक्ती जागृत करणे’ या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, प्राणायाम आणि मंडल योगा अशी विविध योगासने उत्साहाने केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यालयाच्या शिक्षिका मोहिनी पिंपळगावकर यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे.





