pune : पीक नोंदणीचा गुंता सुटणार; तलाठ्यांना अधिकार!
pune :

तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन नोंदणी रखडल्यास ई-फेरफारद्वारे पीक पाहणीची सुविधा
pune : तांत्रिक व भौगोलिक अडचणींमुळे खरिपाची ऑनलाइन पीक नोंदणी जिथे शक्य होत नाही, तिथे आता ई-फेरफारद्वारे पीक पाहणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाईल ॲपमध्ये शेतातील गटांचे अंतर अधिक दर्शविणे, गावांचे नकाशे परस्पर बदलणे किंवा काही गावांचे नकाशे व गट क्रमांक उपलब्ध नसणे यांसारख्या तांत्रिक व भौगोलिक अडचणी येत आहेत.
अशा त्रुटींमुळे शेतकऱ्यांची पीक नोंदणी प्रलंबित राहू नये, म्हणून चालू खरीप हंगामाकरिता ई-फेरफार प्रणालीद्वारे तलाठी स्तरावर पीक पाहणीची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमिअभिलेख यांना याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तांत्रिक व भौगोलिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची ऑनलाइन नोंदणी रखडू नये आणि त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासनाने ई-फेरफार प्रणालीद्वारे पीक पाहणीची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.





