पुणे – महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. कॉंग्रेस पक्षच पुणे लोकसभा निवडणूक लढणार, असे शिंदे यांनी सांगितले. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपासून ते बूथ पातळीपर्यंत सर्व स्तरावर कॉंग्रेस पक्षाने तयारी केलेली आहे. पक्षाचा उमेदवार नक्की निवडून येईल, असा दावा पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी शनिवारी येथे केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी बैठक दि. 23 जानेवारीला पुण्यातील कॉंग्रेस भवन येथे होत आहे. पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी अॅड. अभय छाजेड, संगीता तिवारी, अजित दरेकर, उपस्थित होते. कॉंग्रेस भवन येथे होणाऱ्या या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या बैठकीला दीड हजारापेक्षा अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे देखील उपस्थित असणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी होणार आहेत. बूथ कमिटी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी, संघटनात्मक बांधणी अशा विषयांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, मतदार आणि राजकीय पक्षांना ईव्हीएमबाबत शंका आहे. ती दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी एक वेळा ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणीही शिंदे यांनी यावेळी केली.