pune : ढोल- ताशा पथकांचे डेसिबल रडारवर
pune :

पोलीस आयुक्त; मिरवणूक मार्गावर १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे निरीक्षण
Pune: गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या ध्वनिवर्धक यंत्रणांबरोबरच आता ढोल-ताशा पथकांच्या आवाजाचीही ‘डेसिबल’ तपासणी केली जाणार असून, निर्धारित मर्यादा ओलांडल्यास संबंधित पथकावरही गुन्हा दाखल केला जाणार आहे.
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण केले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी केवळ डीजे आणि ध्वनिवर्धकांपुरती मर्यादित न राहता ढोल- ताशा पथकांनाही लागू होणार आहे.
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीपासूनच पुण्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा सध्या खूपच चर्चेत आहे. त्यातच धार्मिक मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. न्यायालयाने ध्वनिपातळीचे मोजमाप करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक नियोजन केले आहे.
विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांच्या ध्वनिवर्धक यंत्रणांवरही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. मंडळांना चार ‘टॉप’ आणि चार ‘बेस’ स्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. या मर्यादेपेक्षा अधिक स्पीकर वापरल्याचे आढळल्यास संबंधित मंडळाची संपूर्ण ध्वनिवर्धक यंत्रणा जप्त केली जाणार आहे, असे पोलीस आयुक्तांनी यांनी स्पष्ट केले. प्लाझ्मा स्पीकर आणि मिड- प्रेशर स्पीकरच्या वापरावरही निर्बंध कायम आहेत.
याशिवाय ढोल- ताशा पथकांकडून वापरण्यात येणाऱ्या ‘टोल’ या वाद्याच्या वापरावरील बंदीचीही अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास केवळ सूचना देऊन कारवाई थांबवली जाणार नसून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
ढोल- ताशा पथकातील ढोल व ताशांची संख्या किंवा पथकातील सदस्य संख्येवर पोलिसांनी कोणतीही मर्यादा घातलेली नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने वादक असलेल्या पथकांना मिरवणुकीत सहभागी होता येणार आहे. मात्र, पथकाचा एकत्रित आवाज निर्धारित डेसिबल मर्यादेपेक्षा अधिक होणार नाही, याची जबाबदारी संबंधित पथकावर राहणार आहे. मिरवणुकीच्या मार्गावर होणाऱ्या ध्वनिपातळीच्या मोजमापातून त्याचे निरीक्षण केले जाणार आहे.





