कोंढवा, (महादेव जाधव) – पुणे शहरालगतची 34 गावे महापालिकेमध्ये समाविष्ठ झाली. या गावांचा सुनियोजित विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. परंतु, या भागात पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांही पुरेशा मिळत नसताना पालिका वाढीव दराने मिळकत कर वसूल करीत आहे. शहरापेक्षा या 34 गावांतून करवसुली 100 टक्के झालेली असताना सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आधी सुविधा पुरवा, नंतर कर घ्या.., अशी मागणी या गावांतून जोर धरू लागली आहे. उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, औताडेवाडी, वडाचीवाडी, होळकरवाडी, शेवाळेवाडी आदी भागांतील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या गावांचा पालिकेत समावेश होत असताना सर्व 34 गावांचा तेथील भौगोलिक स्थितीनुसार विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी त्या-त्या गावांतील नागरिकांकडून केली जात होती. परंतु, याकडे दुर्लक्ष करीत गावांचा समावेश करण्यात आला. या गावांना किमान मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेवर आर्थिक ताण येणार असल्याचे त्यावेळीच स्पष्ट झाले होते, या गावांच्या विकासासाठी पालिकेने राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती, परंतु, तीही देण्यात आलेली नाही. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पालिका प्रशासनाने तत्काळ या भागाचा समतोल विकास आराखडा स्थानिकांना विश्वासात घेऊन आखली पाहिजे व या भागातील रस्ते, पुरेशा पाणी पुरवठ्यासाठी ठोस पाणीयोजना, आरोग्य सुविधा, कचरा नियोजन करणे गरजेचे आहे. – सचिन घुले-पाटील, माजी उपसभापती, पं.स. हवेली समाविष्ठ गावातील एकही रस्ता समतल नाही, त्या रस्त्यावर पदपथ रहोऊन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहते, तक्रार केली तरी दखल घेतली जात नाही. – निवृत्ती बांदल, माजी सरपंच, उंड्री ओढ्यांचा श्वास तर कधीच कोंडला आहे. मागील अनेक वर्षांपासून पावसाळ्यात ओढ्यालगतच्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरते, त्यावेळी प्रशासन खडबडून जागे होते. त्यानंतर पुन्हा जैसे थे, अशी परिस्थिती होते. गेल्यावर्षी एक कार ओढ्यातील पुरात वाहून जाताना सतर्क नागरिकांनी ती बाहेर काढली होती. – दीपक धावडे, माजी उपसरपंच, पिसोळी दररोज पाणी विकत घेतो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बट्ट्याबोळ, आरोग्य सुविधा नाही, शिक्षणाच्या सुविधा नाहीत, तरीसुद्धा वाढीव नव्हे दुप्पट-तिप्पट कराची बिले आम्हाला पाठवून पालिका प्रशासन आमच्यावर अन्याय करत आहे. – उल्हास शेवाळे, माजी सरपंच, ऊरुळी देवाची ड्रेनेज, पाणी, पथदिवे या विषयी तक्रार केली, तर क्षेत्रीय कार्यालयाकडे जा, असे सांगितले जाते. अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये आरोग्य केंद्र आणि तक्रार निवारण केंद्र सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी. – स्नेहल दगडे, माजी सरपंच, पिसोळी