Pune : युजर चार्जेसविरोधातील आंदोलन स्थगित; पणनमंत्र्यांच्या आश्वासनानंतर व्यापाऱ्यांना दिलासा
Pune : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या युजर चार्जेस आकारणीविरोधात राज्यभरातील व्यापाऱ्यांनी पुकारलेले आवक बंद आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे.

Pune : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या युजर चार्जेस आकारणीविरोधात राज्यभरातील व्यापाऱ्यांनी पुकारलेले आवक बंद आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर युजर चार्जेसच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याबाबत आणि संबंधित कायद्याचा पुनर्विचार करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती आणि दि पूना मर्चंटस् चेंबरने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मंगळवारी (ता. ९) मंत्रालयात व्यापारी प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने २२ मे २०२६ रोजी युजर चार्जेस आकारणीबाबत काढलेल्या परिपत्रकाच्या निषेधार्थ दि पूना मर्चंटस् चेंबरने आंदोलनाची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने राज्यातील व्यापाऱ्यांची बैठक घेऊन विविध ठराव मंजूर केले होते. या ठरावांमध्ये युजर चार्जेसचा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा रद्द करून नव्याने सर्वसमावेशक कायदा तयार करावा, अशी भूमिका मांडण्यात आली. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत २०२४ मध्ये आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत २०२५ मध्ये झालेल्या संयुक्त बैठकीतील प्रलंबित विषयांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली.
याच अनुषंगाने राज्यातील व्यापाऱ्यांनी ५ जूनपासून शेतकऱ्यांकडून थेट येणारा माल वगळता भुसार बाजारातील नियमित, अनियमित आणि अनुषंगिक सर्व प्रकारच्या मालाची आवक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ४ जून रोजी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या समवेत झालेल्या संयुक्त बैठकीत व्यापारी संघटनांची बाजू सविस्तरपणे मांडण्यात आली. या बैठकीत युजर चार्जेसच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याबाबत तसेच संबंधित कायद्याचा पुनर्विचार करून तो रद्द करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री रावल यांनी दिल्याची माहिती चेंबरकडून देण्यात आली.
या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी खासदार मुरलीधर मोहोळ आणि आमदार माधुरी मिसाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे चेंबरने नमूद केले आहे. तसेच आडते असोसिएशन, हमाल पंचायत, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, पुणे रिटेल व्यापारी महासंघ, स्टेशनरी कटलरी असोसिएशन आणि ग्राहक पंचायत यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल चेंबरने आभार व्यक्त केले आहेत.
“युजर चार्जेससह इतर प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. ९ जून) मंत्रालयात व्यापारी प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती आणि दि पूना मर्चंटस् चेंबरने ५ जूनपासून सुरू होणारे आवक बंद आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.” – राजेंद्र बाठीया, अध्यक्ष, दि पूना मर्चंटस् चेंबर/ समन्वयक, महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती,





