पुणे : राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध

पुणे –राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील तीनही पक्षाकडून पुणे शहरात ठिकठिकाणी आंदोलन केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. “खोटं बोल पण रेटून बोल’ हे सूत्र वापरून इतिहासाची सतत मोडतोड करणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे व्यापक कारस्थान आहे. राज्यपाल यांनी केलेले वक्तव्य अनावधानाने नसून, भाजपच्या व्यापक षड्यंत्राचाच भाग आहे. त्यांनी दोन दिवसात माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना तयार राहावे. यावेळी ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक योगेश ससाने, सचिन दोडके, प्रवक्ते प्रदीप देशमुख, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे उपस्थित होते.
शिवसेना पुणे शहर
संघटनेच्या वतीने एस.एस.पी.एम.एस. शाळा, शिवाजीनगर येथे निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यपाल यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, नगरसेवक संजय भोसले, पल्लवी जावळे, विशाल धनवडे, गजानन पंडित, राजेंद्र शिंदे, रामभाऊ कदम, दीपक शेडे, प्रशांत राणे, भरत कुंभारकर उपस्थित होते.
पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी
कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली एस.एस.पी.एम. एस. शाळा, शिवाजीनगर येथे “जोडो मारो आंदोलन’ करण्यात आले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, गटनेते आबा बागुल, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, अनिल सोंडकर, शेखर कपोते, पूजा आनंद, विशाल मलके, नीता रजपूत, सोनाली मारणे, हाजी जाकीर शेख, नगरसेवक रवींद्र धंगेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, संगिता तिवारी, विजय खळदकर उपस्थित होते.
चंदननगर येथे राष्ट्रवादी युवकचे आंदोलन
विश्रांतवाडी, दि. 28 (प्रतिनिधी) – अखंड भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी एका कार्यक्रमात महाराजांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्याबाबत चुकीची माहिती दिली होती. राज्यपाल महोदय यांनी केलेल्या या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने चंदननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी युवक शहर कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, मतदारसंघ अध्यक्ष ऍड. नानासाहेब नलावडे, नगरसेवक महेंद्र पठारे, ऍड. भैय्यासाहेब जाधव, माजी नगरसेविका उषा कळमकर, नगरसेविका सुमन पठारे, युवक अध्यक्ष किरण खैरे, कुलदिप शर्मा, वैभव पंचमुख, सागर खांदवे, मयुर गलांडे, निखिल गायकवाड, महिला अध्यक्ष निता गलांडे आदी उपस्थित होते.





