Pune : खुला रिक्षा परवाना बंदीचा प्रस्ताव

प्रशासनाच्या निर्णयाचे रिक्षा पंचायतीकडून स्वागत
पुणे – खुल्या रिक्षा परवान्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीबरोबरच प्रदूषण वाढले, त्यामुळे खुला रिक्षा परवाना तत्काळ बंद करावा, अशी मागणी रिक्षा पंचायत व राज्य रिक्षा संघटना कृती समितीने केली आहे. त्यानुसार परवाना बंद करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन रिक्षा पंचायतीला दिले आहे.
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षांची संख्या दीड लाखांच्या पुढे गेली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि बेशिस्तपणा वाढला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवाना तसेच नवीन बॅज देणे त्वरित थांबवावे, अशी मागणी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानुसार पुणे महापालिका, जिल्हा प्रशासन प्रमुख तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि शहर पोलीस प्रशासन यांच्यात बैठक झाली.
या बैठकीत रिक्षा परवाना बंदीबाबत गांभीर्याने चर्चा झाली. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये खुला रिक्षापरवाना बंद करावा, असे सरकारला कळवण्याचे ठरले आहे. या भूमिकेचे रिक्षा पंचायतीने स्वागत केले आहे. तसेच, प्रशासकीय इच्छा शक्ती दाखवून, मुक्त रिक्षा परवाना बंदीचा निर्णय करून त्याची ताबडतोब अंमलबजावणी करावी, अशी मागणी रिक्षा पंचायतीने लावून धरली आहे.
दरम्यान, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी या मागणीला विरोध केला असून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिक्षा परवाना बंद करणे चुकीचे आहे. याउलट खासगी वाहनातून प्रदूषण वाढते. प्रवास आणि प्रदूषण कमी करण्यासाठी घरच्या उंबऱ्यापासून ते थेट कामाच्या ठिकाणापर्यंत सार्वजनिक वाहतूक ही रिक्षाच्या माध्यमातूनच होऊ शकते.





