Pune : शासन आदेशानंतरच हिंदी पाठ्यपुस्तकांची छपाई

पुणे – यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आठवडा झाला, तरी हिंदी या तृतीय भाषेची पुस्तके छापण्यात आली नाहीत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाला (बालभारती) अद्याप पुस्तके छापण्याबाबत राज्य शासनाकडून आदेश देण्यात आलेले नाहीत. आदेश प्राप्त झाल्यानंतरच पुस्तक छपाईची कार्यवाही होणार असल्याचे बालभारतीकडून सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (विद्या प्राधिकरण) राज्य मंडळाच्या इंग्रजी, मराठी आणि इतर माध्यमांच्या शाळांसाठी पहिली आणि दुसरीसाठी विषयवार वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार तिसरी भाषा म्हणून हिंदी किंवा इतर भारतीय भाषा शिकविण्याबाबत आदेश दिले आहेत.
दरम्यान, हिंदी भाषेबाबतचा आदेश मान्य नाही, तसेच हिंदी भाषेची पुस्तके छापण्याचा प्रयत्न झाला, तर छपाई बंद पाडू आणि हिंदीच्या एकाही पुस्तकाचे वितरण करू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे. हिंदी भाषा किंवा इतर भाषा आठवड्यातून पाच दिवस शिकविण्याचे सांगण्यात आले असून, ही प्रत्येक तासिका ३५ मिनिटांची आहे. मात्र, पुस्तक छपाईला बालभारतीने अद्याप सुरुवातच केलेली नाही. त्यामुळे पुस्तकाअभावी विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे, असा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे.
‘बालभारतीला हिंदी विषयाच्या पुस्तक छपाईचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. छपाईसाठी आदेश मिळाल्यानंतरच पुस्तक छपाई सुरू करण्यात येईल. नेमकी पुस्तकांच्या मागणीची संख्याही लागणार असून, त्यानुसारच पुस्तक छपाई केली जाईल.’- कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती.





