pune : मनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य

उपमुख्यमंत्री पवार; ११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर
पुणे – मागील काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांमध्ये मानव-बिबट्या संघर्षाची परिस्थिती गंभीर आहे. याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेऊन बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आणि मानव-बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी तब्बल ११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मनुष्यहानी रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य असून, नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
मागील पाच वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. नुकत्याच झालेल्या हल्ल्यांत एका १३ वर्षीय चिमुरड्याचा, तसेच एका वृद्ध महिलेसह लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यांत उसाचे क्षेत्र, पाण्याच्या मुबलकतेसह अनुकूल वातावरणामुळे बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे तेथे बिबट्या आणि नागरिकांत सातत्याने संघर्ष होत आहे.
त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी आमदार, माजी मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी ११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात २० विशेष रेस्क्यू टीम कार्यरत होणार असून, टीममध्ये प्रशिक्षित नेमबाज, शोधक, ट्रँक्युलायझिंग गन, रेस्क्यू वाहने,
अत्याधुनिक कॅमेरे, पिंजऱ्यांसह आवश्यक उपकरणांचा समावेश असेल. या मोहिमेत ५०० पिंजरे, २० ट्रँक्युलायझिंग गन, ५०० ट्रॅप कॅमेरे, २५० लाइव्ह कॅमेरे, ५०० हाय-पॉवर टॉर्च, ५०० स्मार्ट स्टिक, २० मेडिकल इक्विपमेंट किट्स यांसह प्रत्येक टीममध्ये ५-६ प्रशिक्षित सदस्य असतील.
निधीतून रेस्क्यू टीम, साधनसामग्री
या उपाययोजनांमुळे बिबट्यांना मानवी वस्त्यांपासून सुरक्षित अंतरावर ठेवणे, त्यांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करणे आणि मनुष्यहानीचे प्रमाण कमी करणे शक्य होईल. वन्यजीवांचे संरक्षण करताना मानवी जीविताचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. या निधीतून रेस्क्यू टीम, पिंजरे आणि तांत्रिक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.





