Pune: अतिवृष्टीमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा रद्द

पुणे – पुण्यात झालेल्या अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पुणे दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रपती मुर्मू ह्या दि. २९ जुलै रोजी लवळे येथील सिंबायोसिस विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी येणार होत्या. मात्र, पावसामुळे हा दौरा रद्द झाल्याचे राष्ट्रपतींच्या कार्यालयातून सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला कळविले आहे. दरम्यान, यामुळे सध्याच्या आपत्तकालीन स्थितीत व्यस्त असलेल्या शासकीय यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
याबाबतची माहिती सिंबायोसिस विद्यापीठाच्या कार्यालयाकडून देण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या २८ ते ३० जुलैदरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होत्या. सध्या पुण्यासह राज्यभरात सुरु असलेली अतिवृष्टी, महापुराचा विचार करुन हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
पुणे शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणांतून पाणी सोडल्यामुळे सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दि. २९ जुलै रोजी होणारा दीक्षांत समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
दरम्यान, राष्ट्रपती मुर्मू ह्या पहिल्यादांच पुण्यात सिंबायोसिस विद्यापीठाला भेट देणार होत्या. त्यादृष्टीने विद्यापीठाने २१ व्या दीक्षांत समारंभासाठी जय्यत तयारी केली होती. विद्यापीठ संकुलात भव्य मांडव उभारला होता. परंतु राष्ट्रपतींचा दौरा रद्द झाल्याने हा समारंभाची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.





