PUNE: भिडेवाडा स्मारकास जागा देण्याची तयारी; पुणे मर्चेंट्स को-ऑप. बँकेची भूमिका

पुणे – महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे सुरू केलेल्या मुलींच्या शाळेच्या जागी होणाऱ्या स्मारकाला जागा कमी पडत असेल तर जागा देण्याची तयारी आहे, असे पुणे मर्चेंट्स को-ऑप. बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बँक कधीही भिडेवाड्याविरोधात नव्हती. स्मारकाच्या कामासाठीचा प्रस्ताव बँकेनेच दिला होता, असेही त्यांनी सांगितले आहे.
भिडेवाड्यालगतच असल्याने मर्चट्स बँकेच्या मुख्यालय इमारतीची सात हजार चौरस फूट जागा, पाच हजार चौरस फुटांचे पार्किंग, टेरेसची चार हजार चौरस फूट जागा आणि वाढीव चटई निर्देशांकानुसार मिळणारी आणखी जागा स्मारकासाठी देण्याची बँकेची तयारी आहे. यापूर्वीच पुणे महापालिका आणि बँकेमध्ये त्याबाबत तडजोडीच्या सह्यासुध्दा झाल्या आहेत. त्यासाठी बँकेला रक्कम देण्याची तयारी महापालिकेने केली होती. याबाबत पुढे काहीच झाले नसल्याचेही ढेरे यांनी सांगितले.
बँकेने भिडेवाड्याची जागा १९६८ साली विकत घेतलेली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन सहकारमंत्री अतुल सावे, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत भिडेवाडा स्मारकाच्या कामासाठी बँकेने प्रथमपासूनच सकारात्मक भूमिका घेतली आहे. न्यायालयातही सरकारच्या बाजूनेच निकाल लागला असून २००४च्या दराने भाडेकरूंना मोबदला देण्याऐवजी आत्ताच्या दराने तो मिळावा, अशी भूमिकाही ढेरे यांनी मांडली आहे.





