पुणे – “तहान लागल्यानंतर विहीर न खोदता तयारी सुरू’

पुणे – करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासन व प्रशासनाच्यावतीने आरोग्य सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. “तहान लागल्यानंतर विहीर न खोदता, मागचा आलेला अनुभव पाहता ही भूमिका घेतली आहे. त्यामध्ये मुलांच्या उपचाराबाबत मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार गिरीश बापट, खासदार वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यासह सर्व आमदार आणि अधिकारी उपस्थित होते. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, करोना नियंत्रणासाठी ‘ब्रेक द चेन’ च्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हायला हवे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा. करोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस विभागाने निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करावी.
बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे. असे सांगून अजित पवार म्हणाले, ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, हॉस्पिटल, नायडू रुग्णालय या रुग्णालयांसह जिल्ह्यातील भारती हॉस्पिटल, सिम्बायोसिस हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा खाजगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. “म्युकर मायकोसिस’ रोगाचा प्रादुर्भाव करोना रूग्णांमध्ये वाढत आहे. यासाठीच्या औषधांचा पुरवठा रुग्णालयांना सुरळीत होण्यासाठी तसेच यात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी या औषधांचा पुरवठादेखील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.





