Pune: प्रवेश परीक्षांची तयारी काॅलेजमध्येच व्हावी; मनविसेची शिक्षण आयुक्तांकडे दाद

पुणे – शिक्षणाचे व्यापारीकरण कमी करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयांचा शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासंदर्भात नियमावली तयार करावी. विविध प्रवेश परीक्षांना अभ्यासक्रमात समाविष्ट करुन घ्यावे. त्यांची तयारी काॅलेजमध्येच करून घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शिक्षण आयुक्तांकडे केली आहे.
विज्ञान शाखेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांना डॉक्टर अथवा इंजिनियर व्हायचे असते. अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखामधील प्रवेश हा एमएच-सीईटी, नीट, जेईई या प्रवेश परीक्षांद्वारे होतो. परंतु आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये या प्रवेश परीक्षांची तयारी करुन घेतली जात नाही. या उलट विद्यार्थी महाविद्यालयाची फी भरुनही महाविद्यालयात हजर राहत नाही. प्रायव्हेट कोचिंग क्लासेसमध्ये लाखो रुपये फी भरुन क्लासेसला जातात.
परंतु इतके पैसे खर्च करुनही यांच्या पदरी निराशाच येते. गरीब विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातून असल्याने महागड्या क्लासेसला जाऊ शकत नाही. कनिष्ठ महाविद्यालयांतच प्रवेश परीक्षांची तयारी करुन घेतल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी उपलब्ध होईल. युवकांना डॉक्टर व इंजिनियर बनण्याची संधी मिळेल, असे संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य शैलेश विटकर, रवींद्र बनसोडे, पुणे शहराध्यक्ष अमोल शिंदे यांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे.





