Pune: खडकवालामध्ये वीज पुरवठ्याच्या तक्रारी

धनकवडी – खडकवासला विधानसभा मतदारसंघात तांत्रिक अडथळ्यासह वीज पुरवठ्याच्या अधिक तक्रारी झाल्या. वारजे येथील कै. शामराव श्रीपती बराटे विद्यालय मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच वीज पुरवठा खंडित झाल्याने मतदान प्रक्रिया काही वेळ थांबविण्यात आली. दहा मिनीटे वीजपुरवठा खंडीत होता. त्यानंतर महावितरणच्या पथकाने तातडीने दुरूस्तीची कामे करीत वीज पुरवठा सुरू केला, त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वारजे येथील चौधरी शाळेत मतदान केंद्रावर निवडणूक सुरू होण्यापूर्वीच मतदारांनी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर रांगा लावल्या होत्या. या मतदार संघातील पहिले मतदान सकाळी साडेआठ वाजता ज्येष्ठ नागरिक मारुती वारुळे (वय 81) यांनी अहिरे पुनर्वसन गुलाबराव वांजळे शाळेत केले. तर, दुसरे मत शिवणे येथील नवभारत विद्यालयात रामकृष्ण गोविंद इंगळे (वय 81) यांचे नोंदले गेले. डोणजे तसेच कोंढवे- धावडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसह वडगाव बुद्रुक सनसिटी कम्युनिटी हॉल या ठिकाणी नागरिकांनी मतदानाच हक्क बजावला.
असेही वैशिष्ट्यपूर्ण…
वडगाव बुद्रुक येथील शिवसागर सोसायटी क्लब हाऊस हॉल येथे महिला मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. येथील सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी महिला होत्या. परिणामी, महिला मतदारांनी समाधान व्यक्त केले. या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला मतदार होत्या, त्यांचा उत्साह दिसून आला.
तसेच, नांदेड सिटी पब्लिक स्कूल येथील दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा असलेल्या या केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर, आणि मदतनीसांची सोय करण्यात आली होती. या केंद्रात दिव्यांग कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले. बहुली येथे मतदान युवा मतदान केंद्र ठरले. अधिकारी, कर्मचाऱ्यांसह या केंद्रावर ७३३ युवा मतदारांनी मतदान केले.




