Pune : खंडीत वीजेचा पाणी पुरवठ्याला फटका

पुणे : वाढत्या उन्हामुळे महावितरणच्या वीज पुरवठ्यात अडथळे येत असून, वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहेत. बुधवारी दुपारी आणि रात्री पर्वती जलकेंद्र आणि वारजे जलकेंद्राचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर अनेक भागांत सकाळी येणारे पाणी दुपारी उशिरा आणि कमी दाबाने आल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ झाल्याचे पाहायला मिळाले.
शहरात उन्हाचा पाऱ्याने ४० चा आकडा पार केला आहे. परिणामी, वाढत्या गर्मीमुळे वीज यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रकार वाढले असून, त्याचा फटका महापालिकेच्या पाणी पुरवठ्याला बसत आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास महापालिकेचे पर्वती जलकेंद्र आणि वारजे जलकेंद्राचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे या दोन्ही ठिकाणचे पंपिंग बंद पडले होते तसेच खडकवासला येथील जॅकलेवचे पंपिंगही बंद पडले.
परिणामी पुन्हा वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर पाणी शुद्धीकरण यंत्रणा पुन्हा सुरू करण्यासाठी पुन्हा एक ते अर्धा तासाचा कालावधी गेला. त्याचा परिणाम, गरुवारी सकाळच्या पाणी वितरणावर झाला. त्यात प्रामुख्याने मध्यवर्ती पेठांसह, शिवाजीनगर, गोखलेनगर, औंध, कोथरूडचा काही भाग बाणेर-बालेवाडी, पाषाण, सेनापती बापट रस्ता तसेच दोन्ही जलकेंद्रावरून शहराच्या इतर भागांत दिल्या जाणाऱ्या भागात पाण्याचे वेळापत्रक कोलमडले.
बुधवारी रात्रीचा पाणी पुरवठा जवळपास तीन ते चार तास उशिराने झाला. परिणामी, गुरुवारी पहाटे तसेच सकाळी पाणी देण्यात येणाऱ्या भागात महापालिकेस दुपारी पाणी द्यावे लागले. त्यामुळे अचानक पाणी न आल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
‘मी आणि माझी पत्नी आम्ही दोघे नोकरी करतो. सकाळी पाणीच वेळेत आले नाही. अचानक पाणी न आल्याने सर्व कामे सोडून तसेच जावे लागले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आधीच कमी पाणी येते. त्यात पुन्हा पाणी न आल्यास मोठी अडचण होते.’ – अनिकेत जाधव ( नागरिक)





