‘माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तर….’; पुण्यातील अपघात प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

Pune | Porsche Car Accident | Ajit Pawar – पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री पोर्शे कारने दुचाकीला धडक देत एक युवक आणि एक युवती अशा दोघांचा जीव घेतला. अल्पवयीन कार चालक हा दारू पिऊन गाडी चालवत होता. वेदांत अग्रवाल असे अल्पवयीन आरोपीचे नाव आहे. शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर अवघ्या 15 तासांच्या आतमध्ये त्याचा सशर्त जामीन मंजुर झाल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.
वेदांत अग्रवाल चे वडील विशाल अग्रवाल हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यामुळे पैशांच्या बळावर प्रकरण दाबले जात असल्याचा आरोप काही जणांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह ठेवलं जात आहे. आरोपीचा एका पबमध्ये दारू पितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या सर्व प्रकरणानंतर आता लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेदांत याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलीसही अॅक्शन मोडवर आले आणि वेदांतच्या वडिलांना म्हणजेच विशाल अग्रवाल यांना अटक केली. हे प्रकरण दाबण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आरोप केले गेले.
मात्र टिंगरे यांनी हे आरोप बदनामी करण्यासाठी होत असल्याचं म्हटलं. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाबाबत पुणे पोलीस आयुक्तांना फोन करत चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या असे आदेश दिले आहेत.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “पुण्यातील अपघात प्रकरणामध्ये आमचा काहीही संबंध नाही. माझ्या मुलाने असं कृत्य केलं असतं तरी कारवाईचे आदेश दिले असते, असं अजित पवार म्हणाले. अपघात प्रकरणाची चौकशी करून योग्य कायदेशीर निर्णय घ्या असे आदेशही पवारांनी दिले आहेत.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले, पाहा….
राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणातील दोन्ही पब सील केले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ब्लॅक आणि कोझी या क्लबचे मालक आणि मॅनेजर यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली गेली आहे. आज त्यांना कोर्टात नेण्यात आलं होतं. तर वेदांतचे आरोपी विशाल अग्रवाल याला उद्या कोर्टात हजर करण्यात आला आहे. ब्लड पाठवलं असून त्याचे रिपोर्ट आले नाहीत.
कोणतीही निगेटिव्ह रिपोर्ट आलेला नाही. आरोपींनी मद्यप्राशन केलं होतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते दिसत आहे. त्यांनी अल्कोहोलसाठी ऑनलाईन पेमेंट केले होते. त्याचे बिल आले आहे. आमच्याकडील पुराव्यावरून आरोपींनी अल्कहोल घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. असं ते म्हणाले.
विशेष तपासणी मोहीम सुरू –
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने, पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूम ची विशेष तपासणी मोहीम सुरू केली असून परवानाधारक अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करू नये.
परवानाधारकाने पहाटे 1.30 नंतर (दिलेली वेळ) कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करू नये. परवानाधारक महिला वेटर्समार्फत उत्पादन शुल्क विभागाच्या नोकरनामा शिवाय आणि रात्री 9.30 नंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करू शकणार नाही.
जर बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट-1949 आणि बॉम्बे फॉरेन लिकर रुल्स-1953 अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्या आस्थापनांवर नियमानुसार गुन्हे नोंद केले जातील व जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार सदर मद्य विक्री लायसन्स निलंबित अथवा रद्द केले जातील, असे राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांनी सांगितले आहे.





