Pune : कल्याणीनगरमधील पोर्श अपघात; रक्त बदलप्रकरणी आरोप निश्चितीस प्रारंभ

पुणे – कल्याणीनगरमधील पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन कारचालकासह त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी सर्व दहा आरोपींविरोधात आरोप निश्चितीला सुरुवात झाली आहे. सरकार पक्षातर्फे प्रत्येक आरोपीविरोधातील आरोप, पुराव्यांची माहिती सादर करण्यात आली.
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २२६ नुसार विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी तब्बल साडेचार तास युक्तिवाद करत खटल्याची संपूर्ण माहिती न्यायालयासमोर मांडली. कल्याणीनगर येथे १८ मे २०२४ च्या मध्यरात्री अल्पवयीन मुलाने पोर्श कार भरधाव चालवून धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. त्यावेळी कारचा वेग किती होता, दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू कशामुळे झाला, याची माहिती त्यांनी दिली.
अपघातापूर्वी कारचालक व पाठीमागे बसलेल्या दोन मित्रांनी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपान केले होते. त्यामुळे रक्ताचे नमुने तपासण्यासाठी सर्वांना ससूनमध्ये नेण्यात आले. तेथे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून शिपाई अतुल घटकांबळेमार्फत ससूनच्या आपत्कालीन विभागाचे तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
या आरोपींचा कटातील सहभाग उलगडत त्यांच्याविरोधातील साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड, व्हॉट्सअप संभाषण, डीएनए चाचणी अहवाल, आरोपींची ओळख परेड, हस्ताक्षर तज्ज्ञांचे अहवाल, रक्ताच्या नमुन्यातील फेरफार, नोंदी कशा बदलल्या गेल्या, आरोपींनी एकमेकांना पैसे कसे दिले, त्यापैकी तीन लाख रुपये जप्त कसे केले, त्याचे तांत्रिक व दृश्य स्वरुपातील पुरावे विशेष सरकारी वकील हिरे यांनी न्यायालयात मांडले. त्यावर बचाव पक्षातर्फे दोन जुलै रोजी बाजू मांडली जाणार आहे.





