pune : भाजपमध्ये मानापमानाचे राजकारण
Pune:

मुख्य सभागृहातील बैठक व्यवस्था बदलली
पुणे – महापालिकेच्या मुख्य सभागृहातील बैठकीच्या जागांवरून सत्ताधारी भाजपमध्ये मानापमानाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. पक्षातील काही ज्येष्ठ नगरसेवकांनी बैठकीच्या जागांबाबत नाराजी व्यक्त करीत वरिष्ठांकडे दाद मागितल्यानंतर अखेर मुख्य सभागृहातील बैठक व्यवस्थेत फेरबदल करण्यात आला.
सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवक नव्या जागांवर बसलेले दिसून आले. पक्षातील काही नगरसेवकांनी या आसन व्यवस्थेबाबत थेट उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केल्याने हे बदल केल्याची चर्चा पालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महापालिकेत भाजपचे सर्वाधिक १२६ नगरसेवक आहेत. त्यामुळे सभागृहातील बहुतांश जागांवर भाजपचे नगरसेवक बसतात. निवडणुकीनंतर पक्षाने नगरसेवकांची ज्येष्ठता, पक्षातील जबाबदारी आणि राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन बैठक व्यवस्था निश्चित केली होती.
मात्र, या व्यवस्थेत काही नवोदित तसेच इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांना पहिल्या रांगेत स्थान मिळाल्याने अनेक ज्येष्ठ नगरसेवक नाराज होते. या नाराजीच्या तक्रारीनंतर पहिल्या रांगेतील काही जागांमध्ये बदल करण्यात आला असून, ज्येष्ठ नगरसेवकांना पुढील बाकांवर स्थान देण्यात आले आहे.
त्यामुळे यापूर्वी पुढील रांगेत बसणाऱ्या काही नगरसेवकांना मागील बाकांवर जावे लागले. नव्या व्यवस्थेनुसार किरण दगडे, श्रीकांत जगताप आणि प्रसन्न जगताप यांच्यासह काही नगरसेवकांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले आहे.
तर यापूर्वी पहिल्या रांगेत बसणारे सनी निम्हण, सुरेंद्र पठारे, बाळा ओसवाल आणि सचिन दोडके यांची आसनव्यवस्था बदलण्यात आली आहे. महापालिकेच्या सभागृहातील पहिल्या रांगेत बसण्याला राजकीय प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या बदलामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि मानापमानाचे राजकारण पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.





