पुणे : प्रभाग रचनेबाबत राजकीय दबाव!

पुणे- प्रभागरचनेबाबत महापालिका आयुक्त आणि अधिकारी राजकीय दबावात असल्याचा दावा माजी नगरसेवक आणि “आपले पुणे’ संस्थेचे अध्यक्ष उज्ज्वल केसकर आणि माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी यांनी केला आहे. प्रभाग रचनेबाबत काही मुद्दे उपस्थित करणारे पत्र केसकर आणि कुलकर्णी यांनी नगरविकास उपसचिव प्रियांका छापवाले यांना पाठवले आहे.
पुणे महापालिकेने केलेल्या आणि आता रद्द झालेल्या प्रभाग रचनेत ज्या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तेथे प्रभाग मोठे मतदार संख्या कमी आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत, तेथे प्रभाग छोटे आणि मतदार संख्या जास्त असे घडले होते. मात्र, आता तसे होणारच नाही याची आम्हांला खात्री नसल्याचे सांगत हडपसर विधानसभा मतदार संघाचे उदाहरण केसकर यांनी पत्रात दिले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 2017 मध्ये जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीचे गण हरकती सूचना मागवून निश्चित केले होते. यातील 23 गावे आता महानगरपालिकेत आल्यानंतर या गट आणि गणांची विभागणी करून या गावातील लोकांना लोकप्रतिनिधीत्व मिळणार नाही, तर बाहेरचे प्रस्थापित नेते निवडणूक लढवतील आणि या गावातील लोक फक्त मतदान करतील अशा प्रकारची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोयीची प्रभाग रचना केली होती, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त पुण्याची प्रभाग रचना नि:पक्षपातीपणे करू शकतील का नाही, याविषयी या दोघांनी शंका व्यक्त केली आहे.





