Pune Police: पोलीसच आता शोधणार शहरातील खड्डे! वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी आयुक्तांचा ‘मास्टरप्लॅन’ काय?
Pune Police: रस्त्यावर उभं राहून नियमन करण्याऐवजी कोंडीचे मूळ शोधण्यावर भर; पुणे पोलीस आयुक्तालयाकडून 'मिशन कोंडीमुक्त पुणे' अभियानाला सुरुवात.

Pune Police – शहरातील चौकात, रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्याऐवजी कोंडीची मूळ कारणे शोधून दूर करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहतूक नियमनावेळी रस्त्यावर, चौकात खड्डे आढळल्यास त्याची माहिती महापालिकेला देऊन ते तातडीने बुजवून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर सोपविली आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्डे वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो. वाहनचालकांना अचानक ब्रेक लावणे, वाहनाचा मार्ग बदलणे किंवा खड्डा चुकविण्यासाठी बाजूला जाणे भाग पडते. त्याचा परिणाम वाहतुकीच्या प्रवाहावर होऊन चौकांमध्ये कोंडी निर्माण होते. यामुळे वाहतूक पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रमुख रस्ते आणि चौकांची प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणारे खड्डे शोधावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
कोंडीचा शोध
शहरातील प्रमुख चौकांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीचा पोलिस आयुक्तांनी स्वतंत्रपणे आढावा घेतला आहे. कोणत्या चौकात कोणत्या कारणामुळे कोंडी होते, याची माहिती नकाशाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. त्यानुसार केवळ कोंडीच्या ठिकाणी वाहतूक नियमन न करता कोंडी निर्माण करणारी कारणेच दूर करण्यावर भर देण्यात येणार आहे. रस्त्यावरील खड्डे, अरुंद रस्ते, चुकीच्या पद्धतीने उभारलेले अडथळे,
रस्त्यावर होणारे अतिक्रमण अथवा अन्य कारणांमुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरात खड्डे नसल्याचा दावा पालिका करत असली, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांकडून प्रत्यक्ष पाहणी करून खड्ड्यांची ठिकाणे पालिकेच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहेत.





