Pune: भरधाव कारने पाच वाहनांना धडक देणाऱ्या तरुणाला पोलिस कोठडी

पुणे – बाणेर येथे भरधाव कारने स्कूल बससह पाच वाहनांना धडक देणाऱ्या तरुणाला बाणेर पोलिसांनी अटक केली. या तरुणाने मद्य प्राशन केले असल्याचा संशय असून, त्याची वैद्यकीय तपासणी करायची असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
ऋतिक शाम बनसोडे (वय १९, रा. ननावरे चौक, बाणेर, मूळ रा. उमरगा, धाराशिव) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात बाणेर-पाषाण लिंक रस्ता येथील एका रहिवाशाने बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास बाणेरमधील ननावरे चौक ते पाषाण-सूसरोडवरील शिवशक्ती चौकादरम्यान घडली.
आरोपीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करत भरधाव वेगात चारचाकी चालवून एका स्कूलबससह चार मोटारींना धडक दिली. त्यामध्ये तक्रारदार व त्यांच्या मुलीला किरकोळ जखम झाली, तसेच पाचही चारचाकींचे नुकसान झाले, असे तक्रारीत नमूद आहे. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, अपघातानंतर पळ काढणाऱ्या आरोपीच्या कारवर संतापलेल्या स्थानिकांनी दगडफेक केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी कारचालकाला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले.
आरोपीची वैद्यकीय चाचणी करायची आहे, त्याने वापरलेली कार कोणाच्या मालकीची आहे, त्याच्यासोबत कारमध्ये आणखी कोण होते, याचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी केली.





