सूर्या हॉटेलवर पुणे पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायातून सहा महिलांची सुटका

दौंड – दौंड तालुक्यातील खडकी येथील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सूर्या हॉटेल व लॉजिंवर पुणे पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. कारवाईत पोलीसांनी सहा महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
रवीश शेट्टी (सध्या रा. खडकी, ता. दौंड, मूळ रा. मेलासुर ता. कुंदापूर, कर्नाटक), सोनू, बब्बी शेठ, सुनील जामगे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), असे आरोपीची नावे आहेत. शनिवारी (दि.9) रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
खडकी येथील सूर्या हॉटेल व लॉजींगवर वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी 6 महिलांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व उपजीविका चालविण्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी 6 महिला व वेश्याव्यवसाय करण्यासाठी लागणारा एकूण 29 हजार 200 रोख रक्कम व मुद्देमाल ताब्यात घेतला. याबाबत पुणे सायबर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी फिर्याद दिल्याने दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे करीत आहेत.
दरम्यान, सूर्या लॉजवर यापूर्वी दोनवेळा पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. त्याचवेळी दौंड पोलिसांनी लॉजची मान्यता रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर का केला नाही, याची चर्चा सुरू झाली आहे.





