Pune : स्वारगेट भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

पुणे : स्वारगेट भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी एका महिलेला अटक केली असून, साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस हवालदार प्रीती मोरे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी मसाज पार्लर चालक सुनीता नामदेव मांजरे (वय ३३) हिला अटक करण्यात आली. याप्रकरणी मसाज पार्लरमधील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट भागातील एका इमारतीत आरोपी सुनीता मांजरे मसाज पार्लर चालवित होती. मसाज पार्लरच्या नावाखाली तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून कारवाई केली. मसाज पार्लरमधील तरुणींना ताब्यात घेण्यात आले.मसाज पार्लर चालक महिला मांजरे हिच्यासह साथीदाराविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांजरेला अटक करण्यात आली आहे. तिने तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस उपनिरीक्षक सुभाष राठोड तपास करत आहेत. मसाज पार्लरच्या नावाखाली शहरात वेश्याव्यवसाय करण्यात येत असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करण्यात आल्या होत्या.
पोलीस आयुक्तांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी ३३ गुन्हे दाखल केले होते.





