Pune Crime: येरवडा पोलिसांना वाजवावी लागली “बंटीची घंटी’

पुणे – वारंवार इशारा देऊनही स्थानिक पोलीस ठाण्याच्या आश्रयाने जुगार अड्डा सुरु ठेवणाऱ्या चालकास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. आयुक्तांनी स्वत: लक्ष घालत जुगार अड्डयावर कारवाई करण्याचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर ज्या पोलीस ठाण्याच्या आश्रयाने हा प्रकार सुरु होता, त्या अधिकाऱ्यांनाच कारवाई करण्यास भाग पाडले. हा कारवाई अड्डा पुर्णपणे उधवस्त केला गेला. या कारवाईचा इतर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.
पोलिस आयुक्तालयातील सुत्रांनी सांगीतले की, जुगार अड्डा चालक बंटी मिश्रा (३६) याला अटक करण्यात आली आहे. यावेळी नऊ व्यक्ती जुगार खेळताना सापडले आहेत. त्याच्या विरुध्द अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या. मात्र विश्रांतवाडी आणि येरवडा पोलीस ठाण्याच्या बॉर्डरवर त्याचा अड्डा होता. यामुळे कारवाई कोणत्या पोलीस ठाण्याने करायची हा वाद सुरु झाला. यातच त्याला अर्थपुर्ण आश्रय होता.
अखेर पोलीस आयुक्तालयातून दोन्ही पोलीस ठाण्यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. ही कारवाई करताना फक्त आरोपीला अटक न करता, त्याचा अड्डयाचा पुर्ण सेटअप तोडून टाकण्यास सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर ज्या अधिकाऱ्यांनी त्याला आश्रय दिला, त्यांनाच त्याला चोप देण्यास भाग पाडण्यात आले. स्थानिक पोलीस ठाणे अवैध धंद्यांना आश्रय देत असतील, तर त्यांनीच तो धंदा उधवस्थ करायचा आणि त्यांनीच चालकाला धडा शिवकायचा अशी भुमिका पोलीस आयुक्तांनी घेतली आहे. यामुळे स्थानिक पोलिसांच्या आड लपणाऱ्या अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
“पोलीस तपासात बंटी मिश्रा हा जुगार अड्ड्याचा मुख्य चालक असल्याचे उघड झाले. तो दिघी, पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणी राहून जुगार अड्डे चालवतो. राजीव गांधी नगर झोपडपट्टीत तो अनेक दिवसांपासून जुगार अड्डा चालवत होता. तेथील नागरिकांनी अनेकदा येरवडा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. समाजात सुरक्षा आणि शांतता नांदण्यासाठी अवैध्य धंद्यावर कारवाई करण्यात येत आहे. अवैध्य धंदे आणि अंमली पदार्थाची विक्री कोणत्याही परिस्थितीत चालू देणार नाही. पोलीस ठाण्याच्या प्रभारींना कारवाईचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. त्याचा एक भाग म्हणजे बंटी मिश्रावरील कारवाई होती.” अमितेश कुमार (पोलिस आयुक्त)





