पुणे । मिनी डान्स बारवर पोलिसांचा छापा

कुडजे गाव येथे कारवाई : तिघांना कोठडी

पुणे  -उत्तमनगर पोलीस ठाणे हद्दीत कुडजे गावातील लबडे फार्म हाऊसवर सुरू असलेल्या मिनी डान्स बारवर उत्तमनगर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री छापा टाकून 9 जणांना अटक केली आहे. यात पुणे महानगरपालिकेच्या 4 ठेकेदारांचाही समावेश आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे आणि त्यांच्या पथकाने बुधवारी रात्री 11 वाजता ही कारवाई केली, तर येथे नृत्य करणाऱ्या 5 मुलींची सुटका करण्यात आली आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे या ठिकाणी वेश्‍याव्यवसाय देखील सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपींमध्ये विवेकानंद बडे (42, रा. समर्थनगर, नवी सांगवी), मंगेश शहाणे (32, रा. रामदास सोसायटी, संतनगर, अरण्येश्‍वर), ध्वनीत राजपूत (25, रा. पुरंदर हाऊसिंग सोसायटी, सातारा रोड, पुणे), नीलेश बोधले (29, रा. म्हाडा कॉलनी, पुणे) समीर उर्फ निकेश पायगुडे (39, रा. आगळंबे फाटा, कुडजे गाव), मुंबईतील एक महिला, निखील पवार (33, रा. पर्वती दर्शन), सुजित आंबवले (34, रा. बालाजीनगर) आणि आदित्य मदने (24, रा. मुंबई) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

त्यापैकी मंगेश शहाणे, निखील पवार, ध्वनीत राजपूत, सुजित आंबवले, नीलेश बोधले आणि आदित्य मदने यांची जामिनावर मुक्‍तता करण्यात आली आहे. समीर उर्फ निकेश पायगुडे, विवेकानंद बडे आणि एका महिलेला न्यायालयाने 3 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांनी या तरुणींना मुंबईहून पुण्यात आणल्याचे समोर आले आहे.

उत्तमनगर ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, पोलीस अधिकारी किरण देशमुख, शिवाजी दबडे, अमोल भिसे, धनंजय बिटले, महिला कर्मचारी रेश्‍मा वर्पे यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपरोक्‍त आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पुढील तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्योती लक्का यांनी केली.

आरोपी महिलेनेच आणल्या तरुणी
सुटका झालेल्यांमध्ये एक तरुणी ही पुण्यातील असून इतर तिघी मुंबई, कल्याण आणि ठाण्यातील आहेत, तर एक तरुणी सिलीगुडीची असून, ती मुंबईतच राहण्यास आहे. तिने इतर चार पीडित तरुणींशी संपर्क साधून आरोपी महिलेमार्फत त्या फार्महाऊसवर आल्या होत्या. त्यांची रवानगी न्यायालयाच्या आदेशाने रेस्क्‍यू फाउंडेशनला करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.