Pune Police: गुन्हे शाखा उपायुक्तपदी निखील पिंगळे यांची नियुक्ती; उपायुक्त अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभागाचा कार्यभार

पुणे – गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी निखील पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपायुक्त अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (दि.12) पोलिस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश दिले आहेत. पिंगळे यांनी सोमवारी झेंडे यांच्याकडून गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदाचा कार्यभार देखील स्वीकारला.
पिंगळे हे 2014 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापुर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर, अपर पोलिस अधीक्षक वर्धा, एसआरपीएफ कमांडंट गडचिरोली, पोलिस अधीक्षक लातूर, पोलिस अधीक्षक गोंदिया येथे उल्लेखनिय काम केले आहे. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण राजगुरूनगर येथे पुर्ण केले असून, एमआयटी येथून आयटी इंजनियरींगचे शिक्षण पुर्ण केले आहे.
विशेष शाखेच्या उपायुक्तपदी जी. श्रीधर :
विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तपदी जी. श्रीधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त हिंम्मत जाधव यांना परिमंडळ चारचा कार्यभार देण्यात आल्यामुळे हे पद रिक्त होते. तेथे आता श्रीधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी पोलिस अधीक्षक हिंगोली येथे श्रीधर कार्यरत होते. नुकतीच त्यांची पुण्यात बदली झाली आहे.





