Pune Police Firing: रामटेकडीत थरार!! पोलिसावर चाकूने जीवघेणा हल्ला; सहायक निरीक्षकाने झाडली गोळी
Pune Police Firing: चोरीच्या दुचाकीमधील जीपीएस यंत्रणेमुळे पोलिसांनी लावला माग; शरण येण्याऐवजी पोलिसांवरच हल्ला केल्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार.

Pune Police Firing : रामटेकडी येथे तपासावेळी सराईत गुन्हेगाराने सहायक पोलीस निरीक्षकांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने आरोपी जागीच कोसळला, तर त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत पसार झाला. या थरारक कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जखमी आरोपीचे नाव करणसिंग रजपूतसिंग दुधाणी (२९, रा. रामटेकडी, हडपसर) असे असून त्याच्यावर घरफोडी, चोरी, जबरी चोरी आणि दरोड्यासह तब्बल ३० गुन्हे दाखल आहेत.
त्याला उपचारासाठी ससूनमध्ये दाखल केले आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने पळून गेलेल्या त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी बाणेरमध्ये झालेल्या घरफोडीच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित चोरीच्या दुचाकीवरून फिरताना दिसले होते. दुचाकीच्या क्रमांकावरून मालकाशी संपर्क साधला असता, ती दुचाकी आंबेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे आणि त्यात जीपीएस यंत्रणा असल्याचे समोर आले.
तांत्रिक तपासातून दुचाकी रामटेकडी परिसरात असल्याचे निष्पन्न होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रायकर यांचे पथक रविवारी सकाळी तेथे दाखल झाले. रामटेकडीतील गल्ली क्रमांक पाचमध्ये करणसिंग साथीदारासह चोरीच्या दुचाकीवरून येताना दिसताच पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरण येण्याऐवजी त्याने थेट रायकर यांच्यावर चाकूने वार केला. रायकर यांनी प्रसंगावधान राखत वार हातावर झेलला आणि स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळी झाडली.
गोळी लागताच करणसिंग खाली कोसळला, तर त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळून गेला. करणसिंग दुधाणी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून वानवडी पोलिस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. तो सध्या जामिनावर बाहेर होता. दहा दिवसांपूर्वी, ११ जून रोजी वानवडी पोलिसांनी त्याची नियमित हजेरीही घेतली होती. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपासात घरफोडीच्या आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.




