Pune Police Extortion Case : पोलीस आयुक्तांचा दणका! ६ पोलिसांवर बडतर्फीची कुऱ्हाड; अटकेच्या भीतीने ३ पोलीस फरार
Pune Police Extortion Case : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा कठोर पवित्रा; पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या ६ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची प्रक्रिया सुरू.

Pune Police Extortion Case – पुण्यात पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्या दोन वेगवेगळ्या खंडणी प्रकरणांमध्ये सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करणार असल्याची घोषणा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे. प्राचार्यांना पोक्सोच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून लाखो रुपयांची खंडणी उकळणे आणि आयटी अभियंता तरुण-तरुणींना धमकावून पैसे उकळणे, असे गंभीर प्रकार समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
खंडणीचा गुन्हा दाखल होताच अजित बडे, महिला पोलीस आणि सुदाम तायडे हे तिघेही फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. मंगळवार पेठेतील एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत सात लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजित बडे,
रीलस्टार महिला पोलीस आणि पोलीस कर्मचारी सुदाम तायडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तत्काळ कारवाई करत तिघांना निलंबित केले असून, त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
याचबरोबर वाघोली पोलीस ठाण्यातील हवालदार किरण अब्दागिरे, पोलीस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे यांनी आयटी अभियंता तरुण-तरुणींना सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत दहा हजार रुपये उकळल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. या प्रकरणात तरुणाला मारहाण केल्याचाही आरोप असून, तिघांनाही पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी निलंबित केले आहे.
चुकीला माफी नाहीच…
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, की पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. कोणत्याही चुकीला माफी मिळणार नाही. या सहा जणांना सेवेतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.






