Pune Police: सलग ३६ तास पोलिसांचा खडा पहारा! आंदोलने, मिरवणुका अन् व्हीव्हीआयपी दौऱ्यांमुळे कडकोट बंदोबस्त
Pune Police: अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मिरवणुका अन् VVIP सुरक्षेचे नियोजन यशस्वी; सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडल्याने प्रशासनाचा सुटकेचा निःश्वास.

Pune Police : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरभर निघालेल्या मिरवणुकांमुळे पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले होते. संभाव्य आंदोलने, व्हीव्हीआयपी सुरक्षा, वाहतूक नियोजन आणि मिरवणुकांचा बंदोबस्त अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळताना पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तब्बल ३६ तास रस्त्यावर राहून कर्तव्य बजावले.
लोकमान्य टिळक यांच्या १०६व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ३१ जुलै रोजी पुण्यात दाखल झाले. विमानतळापासून येरवडा येथील हॉटेल तसेच कार्यक्रमस्थळापर्यंतच्या संपूर्ण मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ काँग्रेससह विरोधी पक्षांनी अमित शहा यांना काळे झेंडे दाखविण्याचा आणि मार्ग रोखण्याचा इशारा दिला होता. ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ३१ जुलैपासूनच विरोधी पक्षांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून ३०० कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले.
अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ, येरवडा, सारसबाग, मुकुंदनगर येथील कटारिया मैदान परिसरासह संवेदनशील ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ अधिकारी, पोलिस कर्मचारी, सर्व्हिलन्स व्हॅन आणि विशेष पथके तैनात करून व्हीव्हीआयपी मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.
दरम्यान, १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागांत मिरवणुका काढण्यात आल्या. त्यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांना कायदा-सुव्यवस्थेबरोबरच वाहतूक सुरळीत ठेवण्याचेही मोठे आव्हान पेलावे लागले. ३१ जुलैच्या सकाळपासून सुरू झालेली पोलिसांची धावपळ १ ऑगस्टच्या रात्रीपर्यंत कायम होती.
व्हीव्हीआयपी सुरक्षा, संभाव्य आंदोलने, वाहतूक नियोजन आणि मिरवणुकांचा बंदोबस्त अशा सर्व आघाड्यांवर अधिकारी व कर्मचारी सलग ३६ तास कार्यरत होते. त्यांच्या नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे अमित शहा यांचा दौरा तसेच अण्णा भाऊ साठे जयंतीचे कार्यक्रम शांततेत पार पडले. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अखेर सुटकेचा निःश्वास सोडला.






