Pune : शहरात तुर्तास हेल्मेट सक्तीच्या कारवाईचा बडगा नाही – पोलीस आयुक्त अमितेशकुमार

पुणे :- विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेला प्रवासी अशा दोघांवर कारवाई करण्याच्या राज्य सरकारने काढलेल्या आदेशापासून पुणेकरांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. वाहतुकीबाबत शहरात कार्यरत असलेले विविध विभाग, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी अशा सर्वांची चर्चा करत, हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती केल्यानंतर जानेवारीमध्ये कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या अशा दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना सोमवारी (ता. २८) दिले होते. आत्तापर्यंत केवळ विना हेल्मेट असलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येत होती. आता मात्र सहप्रवाशावर देखील कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई-चलन मशिनमध्ये बदल करण्यात आला आहे.
केवळ सहप्रवाशावर कारवाई करण्याची तरतूद त्यात करण्यात आल्याचे महासंचालकांनी काढलेल्या पत्रात नमूद आहे. त्यानुसार काही ठिकाणी कारवाई देखील सुरू करण्यात आली होती. त्यात विविध स्तरातून विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे याबाबत समाजातील विविध घटकांशी आणि प्रशासकीय यंत्रणांशी चर्चाकरून जानेवारी महिन्यात कारवार्इबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी (ता. २८) दिली.
जनजागृतीवर भर…
विना हेल्मेट दुचाकीस्वार व सह प्रवासी यांचे अपघात व त्यात मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे. मात्र त्यानंतर देखील काही दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहनचालकांनी नियमित हेल्मेटचा वापर करावा, यासाठी आम्ही जनजागृती करण्यावर भर देणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.





