पुणे – पुणे पोलिसांचा धाक उरला नाहीये हे पुन्हा एकदा समोर आले आहे. काल (शुकवारी) सिंहगड रोड परिसरात तर आता (शनिवारी पहाटे) वडगावशेरीच्या गणेशनगर कोयता गँगची दहशत पहायला मिळाली. पुण्यात कोयता टोळीने पोलिस कर्मचाऱ्याच्या गाडीसह १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील गणेश नगरमध्ये ही घटना घडली. यामध्ये सहा कार, चार रिक्षा, तीन दुचाकी आणि इतर वाहनांची कोयता गँगने तोडफोड केली. गुंडाने धुमाकूळ घालत कोयते आणि दगडांनी वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वडगावशेरीच्या गणेशनगर परिसरात काल कोयता टोळीच्या गुंडाने धुमाकूळ घालत हातामध्ये कोयते आणि दगड घेत वाहनांची तोडफोड केली. त्यांनी परिसरात दहशत माजवल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाल्याने पोलिसांचा धाक उरला की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. वडगाव शेरी, चंदननगर भागात मागील काही दिवसांत भांडणाचे दोन चार प्रकारही घडले होते. यामुळे परिसरात अगोदरच तणाव होता. यातच ही घटना घडली. “दारु पिल्यानंतर दोन गटांमध्ये शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास भांडणे झाली होती. यानंतर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास तीन आरोपी गणेशनगर परिसरात आले. त्यांनी हत्यारांनी परिसरातील १४ ते १५ वाहनांची तोडफोड केली. घटना घडल्यानंतर लगेचच पोलिसांनी तीघांनाही ताब्यात घेतले आहे. यातील कोणीही सराईत गुन्हेगार नाही.” – अमोल झेंडे (पोलीस उपायुक्त, गुन्हे)