Crime News : पुणे शहर पोलिसांची धडक कारवाई; सोनसाखळ्यांची लूट करणारी टोळी 12 तासात जेरबंद
Crime News : याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१५/२०२६, भा.न्या.सं. १०९(१), ३११, ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा आणि आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाघोली : गावडेवाडी येथे गोळीबार करून ११ लाख रुपयांच्या सोन्याच्या चैनी लुटून पसार झालेल्या परराज्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-७ आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ने केवळ १२ तासात इंदूर, मध्यप्रदेश येथून जेरबंद केले आहे.
काय आहे गुन्हा?
दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास गावडेवाडी, शिरसवडी ता. हवेली येथे पंडीत गावडे यांच्या बंगल्यासमोर फिर्यादीचे भाऊ हे कारमधून जात असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. त्यांना गंभीर जखमी करून त्यांच्या गळ्यातील ११,००,००० रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चैनी जबरदस्तीने हिसकावून आरोपी पळून गेले होते. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१५/२०२६, भा.न्या.सं. १०९(१), ३११, ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा आणि आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असा लागला छडा
घटनास्थळावर मिळालेल्या मोटारसायकलच्या आधारे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, अंमलदार साळवे, ढोणे, पलांडे, संदिप येळे, विनायक येवले यांनी अवघ्या ४-५ तासात आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर त्यांचा मागोवा घेत २४ तासाच्या आत इंदूर येथून अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी –
१) अविनाश क्रिशनचंद्र त्रिपाठी, वय ४३, रा. बकोरीगाव, हवेली, पुणे मूळ उत्तर प्रदेश
२) सुरेंद्रपाल रामचंद्र पाल, वय ३२, रा. बाराबंकी, उत्तर प्रदेश
३) मोहम्मद शोएब वसीम खान, वय ३७, रा. बाराबंकी, उत्तर प्रदेश
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
मुख्य आरोपी अविनाश त्रिपाठी हा भारत आणि नेपाळमध्ये अनेक मोठे दरोडे टाकल्याप्रकरणी वाँटेड असून त्याच्या अटकेसाठी ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध उत्तरप्रदेशात खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोडा असे २० गुन्हे दाखल आहेत. २०१८ मध्ये उत्तर प्रदेश STF ने चकमकीनंतर त्याला लखनौ येथे अटक केली होती.
सुरेंद्रपाल पाल याच्याविरुद्ध १२ ते १३ चोरी/लुटीचे गुन्हे तर शोएब खान याच्याविरुद्ध ५ गुन्हे उत्तरप्रदेशात दाखल आहेत.
गुन्ह्यातील लुटलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले अग्निशस्त्र याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त गुन्हे गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक आणि शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, राम राजमाने, वाहिद पठाण, दिपक लगड, कांचन जाधव, सहा. पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, श्रीकांत चव्हाण, मदन कांबळे आणि युनिट-७ व दरोडा पथक-०२ च्या पथकाने केली.





