Pune Trafic Police : पुणे पोलिसांची २ हजार ६३३ चालकांविरुद्ध कारवाई ; २० लाखांचा दंड केला वसूल

पुणेः शहरात न्यू इअरचं सेलिब्रेशन मोठ्या धुमधडाक्यात साजरे करण्यात आले. जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू म्हणून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते १ जानेवारी सकाळपर्यंत पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांची करडी नजर मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर होती. शहरातील २७ ठिकाणी करण्यात आलेल्या नाकाबंदीत मद्यपान करून वाहन चालवणे आणि इतर कारणास्तव पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. यातून २० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या मध्यरात्री ८५ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून एकूण २ हजार ६३३ चालकांविरुद्ध दंडात्मक करावाई केली आहे. यामध्ये मद्यप्राशन करुन वाहन चालविणे, भरधाव वेगाने वाहन चालविणे, दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वार, विना हेल्मेट परिधान करून वाहने चालविणे, सिग्नल न पाळणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, परवाना नसताना वाहन चालविणे अशा वाहनांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.


