Lonavala Trafic Jam : थर्टी फस्टसाठी लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची गर्दी ; टॅफिक जामने वाहनांच्या लांबच लांब रांगा

लोणावळाः नववर्षांचं ग्रॅन्ड सेलिब्रेशन करण्यासाठी राज्यभरातून पर्यटक लोणावळा आणि खंडाळा शहरात दाखल होण्यास सुरूवात झाल्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तसेच लोणावळा आणि खंडाळा शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे. कालपासूनच न्यू इअरचं सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येण्यास सुरूवात झाली होती. लोणावळ्यातील गवळी वाडा परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहिला मिळत आहे. खंडाळा गाव ते पोलीस प्रशिक्षण केंद्र दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले आहे.
न्यू इअरचं सेलिब्रेशन खास होण्यासाठी अनेक हॅाटेल मालक इतर व्यावसायिकांना पर्यटकांसाठी खास अॅाफर ठेवली आहे. अशा ठिकाणांचे रिल्स इन्स्टाग्रामवर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल होत आहेत. पर्यटकांनी लोणावळा, खंडाळा परिसरातील बंगले, फार्म हाऊस बुक करून ठेवले आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेला पवनानगर येथील तंबूसाठी देखील अॅडव्हॅान्स बुकिंग करण्यात आली आहे. या व्यावसायिकांनी पर्यटकांचे स्वागत त्यांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात
थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा आणि खंडाळा शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला असल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली.

