Pune : पीएमपीच्या रातराणीला कोटीचे उत्पन्न

पुणे : बाहेरगावाहून रेल्वे, बसने रात्री पुण्यात येणाऱ्या प्रवाशांचा माफक दरात आणि सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) सहा मार्गांवर रातराणी सेवा सुरू केली आहे. त्याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रातराणीच्या सहा मार्गांवर धावणाऱ्या पीएमपीला गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, आणखी काही मार्गांवर बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
शिक्षण, व्यवसाय, नोकरी यासह पर्यटनानिमित्त राज्य आणि राज्याबाहेरील नागरिकांचे पुण्यात ये- जा करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे विमान, एसटी, रेल्वे, खासगी बसमधून रात्री- अपरात्री पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे. त्या वेळी थोड्या अंतर असो की लांबचे अंतर प्रवाशांची रिक्षाचालकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो.
त्यामुळे पीएमपीकडून पाच मार्गांवर रातराणी बस सुरू केली होती. या मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. पुढे प्रवाशांची मागणी व मार्गांचा अभ्यास करून पीएमपीने आणखी एक मार्ग वाढविला आहे. त्यामध्ये पुणे स्टेशन ते निगडी हा नवीन मार्ग सुरू केला आहे. याचा प्रवाशांना फायदा होत आहे.
आणखी मार्ग वाढवा
रात्रीच्या वेळी पीएमपीचा प्रवास सुरक्षित आणि माफक दरात होत असल्याने प्रवाशांकडून नवीन मार्गावर आणखी बस (रातराणी सेवा) सुरू करण्याची आवश्यकता आहे. रात्रीच्या वेळी पुणे विमानतळावरून ये- जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पुणे विमानतळ ते स्वारगेट, पुणे स्टेशन ते विमानतळ, पुणे स्टेशन ते हिंजवडी अशा मार्गांवर रातराणी बस सुरू केल्यास प्रवाशांना फायदा होईल, तसेच काही महिने मनपा ते खराडी, न. ता. वाडी ते कोंढवा खुर्द असे दोन रातराणी मार्ग सुरू केले होते. तेही मार्ग सुरू व्हावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
‘रातराणी’चे बस मार्ग
कात्रज ते शिवाजीनगर बसस्थानक, पुणे स्टेशन ते एनडीए गेट १०, हडपसर ते स्वारगेट, हडपसर ते पुणे स्टेशन, निगडी ते पुणे स्टेशन (वाकडेवाडीमार्गे), कात्रज ते पुणे स्टेशन
पीएमपीकडून सहा मार्गांवर रातराणी बस सुरू आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पीएमपीच्या ताफ्यात नवीन बस दाखल झाल्यावर काही मार्गांवर रातराणी बससेवा वाढविण्याचे नियोजन आहे.
– नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी





