पुणे : रक्षा बंधन आणि सलग सुट्टयांमुळे प्रवाशांसाठी पीएमपीने ८ ते ११ ऑगस्टदरम्यान काही मार्गांवर जादा बस चालवल्या. दोन्ही पालिकांसह पीएमआरडीएच्या हद्दीत चाललेल्या बससेवेमुळे पीएमपीला चार दिवसांत १० कोटी ३५ लाखांचे उत्पन्न मिळाले. रक्षाबंधन काळातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यावर्षी पीएमपीने ७,६९८ अतिरिक्त फेऱ्या केल्या. या बसमधून एकूण ४८ लाख ९२ हजार ८७८ प्रवाशांनी प्रवास केला. १० ऑगस्टचा दिवस वगळता इतर दिवशी १२ लाखांहून अधिक प्रवाशांनी पीएमपीला पसंती दिली. ११ ऑगस्टला फेऱ्यांची संख्या कमी असतानाही उत्पन्न सर्वाधिक मिळाले. रक्षाबंधनादिवशी पीएमपीने महिलांसाठी विविध स्पर्धांही ठेवल्या होत्या.रक्षाबंधनाला सर्वाधिक गाड्या सोडल्याने फेऱ्यांची संख्याही वाढली. विशेष म्हणजे, पीएमपीचे तिकिटदर वाढल्यानंतर रक्षाबंधनला प्रवाशांची संख्या घटेल, असा अंदाज होता; मात्र, हा अंदाज खोटा ठरला. सलग सुट्टी असतानाही महिलांनी पीएमपीला पसंती दिल्याचे दिसते. तीन महिन्यांपूर्वी केलेल्या भाडेवाढीनंतर काही प्रवाशांनी बसप्रवास टाळला होता. आता हेच प्रवासी पुन्हा पीएमपीकडे वळत असल्याचे या उत्पन्नातून तसेच वाढलेल्या प्रवासी संख्येतून समोर येत आहे. दिनांक बससंख्या प्रवासीसंख्या उत्पन्न (रुपयात) ८ ऑगस्ट – १,९११ – १२ लाख ३४ हजार ४८ – २ कोटी ४६ लाख ८९ हजार ९३५ ९ ऑगस्ट – १,९७५ – १२ लाख ३१ हजार ५३१ – २ कोटी ६१ लाख १९ हजार २७ १० ऑगस्ट – १,९३६ – ११ लाख ७७ हजार ६०८ – २ कोटी ४५ लाख ८९ हजार ४२६ ११ ऑगस्ट – १,८७६ – १२ लाख ४९ हजार ६९१ – २ कोटी ८१ लाख ४२ हजार ६० एकूण – ७,६९८ – ४८ लाख ९२ हजार ८७८ – १० कोटी ३५ लाख ४० हजार ४४८ रूपये