Pune | सिग्नल तोडणारे पीएमपी बसचालकही कचाट्यात; हजार ते बाराशे रुपये दंड आकार

पुणे – सिग्नल तोडल्याची तक्रार आल्यास संबंधित बस चालकाला हजार ते बाराशे रुपये दंड पीएमपी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मागील महिन्यात दोन चालकांना हा दंड करण्यात आला आहे. बस चालकांना वाहतुकीची शिस्त लागावी, यासाठी प्रशासनाने कडक पावले उचल्याचे सांगितले.
पुण्याची वाहतूक दिवसेंदिवस वाढत असून, बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरातील रस्त्यांवर कोंडी होत आहे. हे टाळण्यासाठी ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. मात्र, तरीही दुचाकी-चारचाकी वाहनांसह अन्य वाहने सिग्नल तोडतात. एवढेच काय तर सार्वजनिक वाहतूक असलेल्या पीएमपी बसचे काही चालकही सिग्नल तोडतात. अशावेळी चुकून एखादा अपघात झाल्यावर एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. तसेच बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो.
त्यामुळे पीएमपी प्रशासनाने अशी दंड वसुली सुरू केली आहे. त्यानुसार दर महिन्यात तीन ते पाच चालकांवर कारवाई होतेच. आता वाहतूक पोलिसांकडूनही अशी कारवाई सुरू करण्यात आली आहे. अशा बेशिस्त बसचालकांच्या वेतनातून हे पैसे कापून घेतले जात आहेत.
येथे करा चालक-वाहकांच्या तक्रारी…
पीएमपी बसची दुरावस्था, अस्वच्छता तसेच चालक-वाहकांची वागणूक, सिग्नल तोडणे यांसह अन्य वाहतूक नियमांचे उल्लघन बस चालकांकडून झाल्यास त्याबाबाबत पीएमपीच्या टोल फ्री क्रमांक 020-24545454 वर संपर्क साधावा. तसेच, ट्वीटर, इन्स्टाग्राम, फेसबुक या पीएमपीच्या समाज माध्यमावर फोटो, व्हिडिओ, बस क्रमांक (पाटीवरील मार्गाचे नाव), घटना घडलेल्या वेळेची माहिती देत, तक्रार करावी. असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
“सिग्नल तोडणाऱ्या बस चालकांवर एक हजार ते बाराशे रुपये दंड केला जातो. हे प्रकार पूर्णपणे बंद व्हावेत, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसचालकाला दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. तरीही चालक किंवा वाहक याच्याविषयी काही तक्रारी असल्यास प्रवाशांनी आम्हाला फोटो, व्हिडिओसह पाठवावे.” – सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल





