Pune: आता पदवीनंतर थेट पीएचडी; युजीसीचा निर्णय

पुणे – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरु आहे. चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील कोणत्याही शाखेच्या उमेदवारांना त्यांना ज्या विषयात पीएच.डी. करायची आहे त्यासाठी परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात पीएचडी करण्याची मुभा राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जून २०२४च्या सत्रापासून केली जाणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेमध्ये (युजीसी नेट) एक मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार चार वर्षे, आठ सत्रांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली.
सहायक प्राध्यापक पदासाठी, कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्तीसाठी युजीसी-नेट ही परीक्षा राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणामार्फत (एनटीए) वर्षातून दोनवेळा घेतली जाते. डिसेंबर आणि जून अशा सत्रांत ही परीक्षा होते. अलीकडेच युजीसीने घेतलेल्या निर्णयानुसार पीएच.डी.साठी नेट परीक्षेतून प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठांतर्फे घेतल्या जाणाऱ्या पीएच.डी. प्रवेश परीक्षा आता संपुष्टात आली आहे.
दरम्यान, युजीसी-नेट परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रा. एम. जगदेशकुमार यांनी बदलाची माहिती दिली. या पूर्वीच्या नियमानुसार युजीसी नेट परीक्षा देण्यासाठी उमेदवार पदव्युत्तर पदवीधारक असणे आवश्यक होते. तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला असलेल्या विषयात उमेदवारांना पीएच.डी. करता येत होती.
आता चार वर्षाच्या पदवीनंतर विद्यार्थ्यांनी कोणत्या अभ्यासक्रमातून पदवी घेतली आहे, हे महत्त्वाचे असणार नाही. त्याच्या आवडीच्या विषयावर पीएचडी करता येणार आहे, असेही यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांनी नमूद केले आहे.





