केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सामाजिक व राजकीय कार्यावर पीएचडी; डॉ. श्रीराम कंधारे यांचा नागपुरात सत्कार

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा चिकित्सक अभ्यास करून त्यावर पीएच.डी. मिळवणारे नांदेड येथील प्रा. डॉ. श्रीराम कंधारे यांचा रविवारी (दि. 2 फेब्रुवारी 2025) नागपुरात विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या संकुलातील धनवटे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सस कराडचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते कंधारे यांचा शाल, श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. मेश्राम होते.
प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पुरण मेश्राम यांनी श्रीराम कंधारेचे अभिनंदन केले. नितीन गडकरींवर शोधप्रबंध सादर करून डॉ. श्रीराम कंधारे यांनी गडकरींच्या पदाची प्रतिष्ठा वाढवली, असे डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले. पाहुण्यांचे स्वागत नीलेश खांडेकर, प्रगती पाटील व रूपाली मोरे यांनी केले.
कार्यक्रमाला, प्रकाश इटनकर, विजय सालनकर, सागर लागड तसेच विदर्भ गौरव प्रतिष्ठान चे पदाधिकारी उपस्थित होते. संचालन शुभदा फडनवीस यांनी तर आभार बाळ कुळकर्णी यांनी मानले. कंधारे यांच्या गडकरींवरील प्रबंधाला बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली आहे. ते नांदेड येथील रहिवासी व नाशिक येथील महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.

पीएडीसाठी नितीन गडकरींचा विषय का निवडला?
रस्ते, महामार्ग यांचे देशभर जाळे विणणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असल्याने पी.एच.डी.च्या प्रबंधासाठी गडकरी या विषयाची निवड केल्याचे प्रा. डॉ. श्रीराम कंधारे यांनी सांगितले.
‘नितीन गडकरी यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे चिकित्सक अध्ययन’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे. कंधारे यांच्या प्रबंधामध्ये एकूण ७ प्रकरणे आहेत. पहिले प्रकरण संशोधनविषयक असून २ ते ७ प्रकरणांमध्ये त्यांचे बालपण ते २०१९ पर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आई भानूताई गडकरी यांचा वाटा, रा. स्व. संघाच्या मुशीत घडलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व, अभाविप व त्यानंतर युवा मोर्चाचे कार्य, भाजपच्या मुख्य धारेत आल्यानंतर त्यांनी पार पाडलेल्या विविध जबाबदाऱ्या, १९८९ साली विधानपरिषदेची पहिली आमदारकी, १९९५ साली सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर केलेले विकासकार्य, विरोधी पक्षनेतेपद, भाजपचे प्रदेशाध्यक्षपद, भाजपाध्यक्षपदाची कारकीर्द आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री झाल्यानंतरचा विकासाचा झंझावात साऱ्याचा आढावा या प्रबंधात घेण्यात आला असल्याचे कंधारे यांनी सांगितले.
प्रबंधासाठी नितीन गडकरी या व्यक्तिमत्त्वाची निवड का केली, असे विचारले असता गडकरी यांचे व्यक्तिमत्त्व अजातशत्रू असे आहे. पारदर्शक कारभार ही त्यांची आणखी विशेषतः त्यांनी पर्यावरण पूरक विकास केला. अपारंपरिक उर्जास्रोतांना चालना दिली. पूर्वोत्तर राज्यांमध्ये रस्त्यांचे जाळे विणले. गुणवत्तापूर्ण काम ही त्यांची विशेषतः आहे. म्हणून नितीन गडकरींवर पी.एच.डी. करायचे ठरवले. असे कंधारे म्हणाले.
डॉ. कंधारे यांनी पुणे विद्यापीठात राज्यशास्त्रात एम. ए. केले आहे. ते मूळचे नांदेडचे आहेत. नाशिक जवळील लासलगाव येथे ते प्राध्यापक आहेत. २०१९ रोजी त्यांनी पी.एच.डी.साठी रजिस्ट्रेशन केले आणि उत्तर महाराष्ट्रातील बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांना पी.एच.डी. प्रदान केली.





