पुणे : बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत चिकूच्या भावात दहा किलोमागे दोनशे रुपयांनी वाढ झाली आहे. हंगाम संपल्याने चिकुची तुरळक आवक होत आहे. पेरूचा हंगाम सुरू झाल्याने तो बाजारात दाखल होऊ लागला आहे. मात्र, अद्याप शाळा सुरू झाली नसल्याने पेरूला मागणी कमी आहे. पावसाच्या तडाख्यामुळे कलिंगड, खरबूजच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारात या फळांची आवक रोडावली आहे. मागणी जास्त असल्याने या फळांच्या भावात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. लिंबे मोठ्या प्रमाणात बाजारात येत असल्याने १५ किलोंच्या गोणीमागे शंभर रुपयांनी दर उतरले आहेत. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. १५) मोसंबी 25 ते 30 टन, संत्रा 1 टन, डाळिंब 25 ते 30 टन, पपई 20 ते 25 टेम्पो, लिंबांची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड 4 ते 5 टेम्पो, खरबूज 2 ते 3 टेम्पो, चिकू 300 बॉक्स, पेरु 400 ते 500 क्रेटस, अननस 4 ट्रक तर सिताफळाची अवघी 40 ते 50 क्रेटस् एवढी आवक झाली.