पुणे : गावठाणाबाहेरील बांधकामांसाठी परवानगी आवश्यकच

पुणे- राज्य शासनाने गावठाण हद्दीपासून 200 मीटरच्या आतील जमीन मालकांना बिनशेती (एनए) परवानगीची आवश्यकता असणार नाही. फक्त जमीन मालकांनी एनए कर भरल्यानंतर त्यांना सनद मिळणार आहे, असा निर्णय नुकताच घेतला आहे. यापार्श्वभूमीवर जमिन एनए झाली असली तरी नागरिकांना बांधकामासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) परवानगी बंधनकारक असल्याचे प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगर नियोजन अधिनियमानुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीएची बांधकाम परवानगी घेने अनिवार्य आहे. गावठाण हद्दीबाहेर बांधकाम परवानगीचे अधिकार हे पीएमआरडीएला आहे. बांधकाम परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर या प्रस्तावाची छाननी करण्यात येते. त्यानंतर पीएमआरडीएकडून बांधकाम परवानगी दिली जाते. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार गावठाण हद्दीबाहेर 200 मीटरच्या आत एनए परवानगी न घेता फक्त कर भरल्यानंतर ती जमिन एनए होणार आहे. यानिर्णयावर काही नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला की आता जमिन एनए झाली तर बांधकाम परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तसेच काही अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी जमिन एनए झाली असे सांगत बेकायदा प्लॉटिंग करण्यास सुरुवात केली. यामधून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर प्राधिकरणाने जमिन एनए झाली असली तरी बांधकाम परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. प्राधिकरणाची बांधकाम परवानगी न घेता बांधकाम केल्यास अशा बांधकामांवर कारवाई करण्याचा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.
प्लॉट खरेदी-विक्रीसाठी परवानगी आवश्यक
एक-दोन गुंठ्यांचे प्लॉटची खरेदी-विक्री करताना त्या आराखड्यास (लेआऊट) पीएमआरडीएची परवानगी घेणे आवश्यक आहे. पीएमआरडीएची परवानगी घेऊनच भूखंडाचे हस्तांतरण अथवा त्यावर बांधकाम करावे, असे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.





