Pune: एक हेक्टर जंगल जळून खाक

पुणे – वारजे येथील वनविभागाच्या स्मृतिवन परिसरातील सुमारे एक हेक्टरहून अधिक जंगलाचा परिसर गेल्या १५ दिवसांत लागलेल्या आगींमुळे खाक झाला आहे. सोमवारीही येथे आगीची घटना घडली आणि अर्धा हेक्टर वनसंरक्षित क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
संपूर्ण देशातील आदर्श जंगल असे या स्मृतिवनाला संबोधले जात होते. मात्र, येथे जवळ असलेल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांकडून येथे आग लावण्यात येते आणि त्यामुळे येथील जंगल जळून खाक होत आहे. वनविभागाने आगीचे कारण मानवनिर्मित असल्याचे शोधून गुन्हा दाखल केला आहे.
जून २०२० मध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सार्वजनिक-खासगी भागीदारीअंतर्गत हरित पट्टा उभारण्यासाठी वारजे शहरी जंगल, ज्याला स्मृतिवन असेही म्हटले जाते, हे देशाचे आदर्श म्हणून घोषित केले. पुणे वनविभागाने परिसराच्या संरक्षणासाठी सहा इंच जाडीची सीमाभिंतही बांधली आहे.
सोमवारी आगीची सूचना मिळाल्यानंतर आमच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीमुळे चार फूट उंचीची झाडे जळाल्याची माहिती पुणे वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार यांनी दिली.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या आगीच्या घटनेसाठी कोथरूड येथून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. याठिकाणी असलेल्या झोपडपट्टीभागातील नागरिक वनपरिक्षेत्रात अतिक्रमण करतात. त्यावर वनविभागाने कारवाई केल्याचा राग मनात धरून ही आग लावल्याचा अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे.
या झोपडपट्टीतील मद्यपी या जंगलभागात पार्ट्या करण्यासाठी अनधिकृतपणे वनपरिक्षेत्रात घुसतात. नुकत्याच लागलेल्या आगीत जवळपास १५ हजार झाडे जळून खाक झाली आहेत, ज्यात गेल्या तीन वर्षात लावलेल्या पाच हजार झाडांचा समावेश आहे, अशी माहिती वारजे शहरी जंगलात वृक्षारोपण आणि संवर्धन मोहीम राबवणाऱ्या निसर्ग सेवा संस्थेचे संस्थापक किशोर मोहोळकर यांनी दिली.
“वारजे येथील नागरी जंगलात नुकत्याच झालेल्या आगीच्या घटनांनंतर वनविभागाच्या वतीने सहा फुटाच्या सीमाभिंतीची उंची १० ते ११ फुटांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यात पुणे महापालिकेबरोबर बैठक होणार आहे. त्यात या प्रकल्पासाठी आम्ही ८० लाख रुपयांची मागणी करून वनक्षेत्राच्या रक्षणासाठी चार जणांची नियुक्ती करण्याची विनंती करणार आहोत.” – दीपक पवार, सहाय्यक वनसंरक्षक, पुणे वनविभाग.





