Pune : दोन दिवसांत सोडले सव्वा टीएमसी

पुणे – खडकवासला धरणातून मुठा नदीत दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले. तर नदीत अद्याप २ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी तुरळक हजेरी लावली असली तरी घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे.
खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांतील पाणीसाठा १० टीएमसी झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा पाणीसाठा जवळपास साडेसहा टीएमसी जादा आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा ३.५८ टीएमसी होता.
पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभरात खडकवासला १ मिमी, पानशेत १२ मिमी, वरसगाव ९ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवघा ७ मिमी पावसाची नोंद झाली. तर खडकवासला धरणात ६३ टक्के, पानशेत धरणात २९ टक्के, वरसगाव धरणात ३९ टक्के आणि टेमघर धरणात १६.३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, पुढील काही दिवसांत पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याने खडकवासला धरणात येणारे पाणी वाढण्याची शक्यता असल्याने मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्य़ाचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे.





