पुणे : अधिकाऱ्यांनी दूषित पाणी प्यावे

सय्यदनगर भागातील नागरिकांचे आव्हान
पालिका पाणीपुरवठा विभागाचे महिनाभरापासून दुर्लक्ष
हडपसर – सय्यदनगर येथील गुलाम अली नगर भागात गेल्या महिन्यांपासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुद्ध पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. याबाबत तक्रार करूनही पालिकेच्या पाणीपुरवठा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अधिकाऱ्यांनी हे पाणी पिऊन दाखवावे, असे आव्हान नागरिकांनी केले आहे.
सय्यदनगर, गुलाम अली नगर भागात दूषित पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून ही समस्या कायम आहे. याबाबत अधिकाऱ्यांना वारंवार कळविण्यात आले आहे. मात्र, दूषित पाण्याच्या पुरवठ्यावर प्रशासन गप्प आहे, असा आरोप येथील नागरिक करत आहेत.
दरम्यान, पालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
या भागात पावसातही ड्रेनेजचे व पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. आता, गेल्या महिन्यापासून या भागात नळातून पिवळसर व गढूळ पाणी येत आहे. पाण्याला दुर्गंधी येत आहे. नागरिकांनी तक्रार केली तर संबंधित अधिकारी त्याला दाद देत नाहीत.
– फारूक इनामदार, माजी नगरसेवक





