पुणे : शिक्षण आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची ‘झाडाझडती’

पुणे (डॉ. राजू गुरव) –“टीईटी’ घोटाळ्यामुळे संपूर्ण शालेय शिक्षण विभाग बदनाम झाला आहे. यापार्श्वभूमीवर नवे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील प्रत्येक विभागाला भेट देत तब्बल चार तास तळ ठोकून अधिकारी, कर्मचाऱ्यांची “झाडाझडती’ घेतली. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात “टीईटी’सारख्या कोणत्याच घोटाळ्याची पुनर्रावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेत पारदर्शक कामे करा, असे आदेशही सूरज मांढरे यांनी बजाविले आहेत.
कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून “टीईटी’च्या निकालात फेरफार करून अपात्र उमेदवारांना पात्र करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षण विभागातील बड्या अधिकाऱ्यांसह परीक्षांचे कामकाज करणाऱ्या खासगी एजन्सीच्या संचालकांना अटक केली आहे. दरम्यान, शिक्षण आयुुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सूरज मांढरे यांनी सर्वात आधी परीक्षा परिषदेच्या कार्यालयाला भेट देण्याचा निर्णय घेत त्याची होळीच्या मुहुर्तावर तत्काळ अंमलबजावणीही केली. आतापर्यंत परीक्षा परिषदेत येवून सर्व विभागांना भेटी देणारे मांढरे हे पहिलेच आयुक्त असून त्यांची ही कामकाजाची “डॅशिंग’ पद्धत नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मांढरे यांनी परीक्षा परिषदेत एन्ट्री करताच आधी परिषदेतील मुख्य आवक-जावक रजीस्टर बारकाईने तपासले. किती पत्रे दाखल झाली व त्यावर कारवाई झाली की नाही याची कसून तपासणी केली. त्यानंतर संपूर्ण कार्यालयाच्या आवारात फेरफेटका मारत सध्याच्या परिस्थीतीचे निरीक्षण केले. प्रत्येक विभागाला भेट देत त्या ठिकाणचे कामकाज व स्वतंत्र आवक-जावक रजीस्टर, फायलींची अवस्था याची पाहणी केली. आस्थापना, भांडार, प्रशासन, शिष्यवृत्ती, टायपिंग, टीईटी, डी.एल.एड. लेखा या विभागांत समक्ष जावून पाहणी केली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही प्रश्नही विचारले. यानंतर सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित आढावा बैठक घेतली. यावेळी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप, उपायुक्त व प्रभारी आयुक्त शैलजा दराडे, उपायुक्त संजयकुमार राठोड यांच्यासह सहायक आयुक्त, अधिक्षक आदी उपस्थित होते. यात अधिकाऱ्यांकडून विविध परीक्षांची माहिती व अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले. त्यावर शिक्षण आयुक्तांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे स्पष्टपणे सांगितले.
- नव्या शिक्षण आयुक्तांच्या सूचना
- राईट टू सर्व्हीस ऍक्टची अंमलबजावणी करा
- प्रकरणे, निवेदने वेळेतच निकाली काढा
- ऑनलाइन कामकाजालाच प्राधान्य द्यावे
- सर्व रजीस्टर, फायली अपडेट ठेवा
- आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करा
- गालबोट लागेल अशी कामे करू नका
- पंधरा दिवसांनी पुन्हा आढावा घेण्यासाठी येणार
- सकारात्मकता ठेवून कामे करा
- नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्यात सुधारणा हवी.





