Pune : अधिकारी खूश! हवी ती पोस्टींग मिळाली…

पुणे : राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाने करण्याचा क्रांतिकारी निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला. त्यानुसार आज समुपदेशनाद्वारे अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. सर्वांना मनाप्रमाणे आणि सहजतेने हवी ती पोस्टींग मिळाल्याने अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
पशुसंवर्धन विभागात अधिकाऱ्यांची समुपदेशनाद्वारे बदल्यांची प्रक्रिया आजपासून आयुक्त पशुसंवर्धन यांच्या कार्यालयात पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सुरू झाली. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामी, आयुक्त प्रवीण कुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतल मुकणे यावेळी उपस्थित होते. हा निर्णय भविष्यातही कायम राहील. गाव पातळीवर कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तुमच्या बदल्या मनासारख्या केल्या आहेत, आता चांगले आणि फ्रेश मनाने काम करा, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
मुंडे म्हणाल्या की, ग्रामविकास मंत्री असताना शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचा निर्णय मी घेतला होता. त्यावेळी त्याचा फायदा अनेक शिक्षकांना जे तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हते त्यांना झाला. आऊट ऑफ बॉक्स जाऊन निर्णय घेण्याची आवड असल्याने आताही पशुसंवर्धन विभागासाठी मी हा निर्णय घेतला.
दरम्यान, समुपदेशनाने बदल्यांची कार्यवाही आजपासून सुरू झाली असून उद्याही म्हणजे १६ मे रोजी ही कार्यवाही सुरू असणार आहे. आज आदिवासी व नक्षलग्रस्त अवघड क्षेत्रात असलेल्या ११८ आणि बिगर अवघड क्षेत्रात असलेल्या ४४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या मनाप्रमाणे करण्यात आल्या. हा निर्णय आमच्या सारख्यांचे मनोबल वाढविणारा असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.





